आपला हा "महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा" आहे, त्यामुळे आपण आधी " विकास " म्हणजे काय हे पहायला हवं. "विकास" हा शब्द कदाचित मराठीतील सर्वांत जास्त वापरून वापरून गुळगुळीत झालेला शब्द असावा. विकास हा शब्द 'कस' या शब्दापासून बनतो. 'कस' म्हणजे हलणे, जाणे. "विकास" म्हणजे पुढे जाणे. आत्ता आहोत त्यापेक्षा पुढे जाणे. आपलं जीवनमान सर्व बाजूनं सुधारणे. आनंद वाढवणे.
जगभर यावर गेली काही वर्षं खूप विचार झाला. आपण नुसताच "विकास" करणं उपयोगी नाही तर तो सतत चालणारा असला पाहिजे. म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे म्हणून ती कापून खायची नसते तसंच विकासाचं आहे. विकास असा करायचा नसतो की तो क्षणभंगुर ठरेल. विकास असा करायचा नसतो की तो आज होईल पण उद्या होणार नाही. म्हणून जगात हे मान्य झालं की " विकास " म्हणजे "टिकाऊ विकास". "टिकणारा, सतत चालू रहाणारा विकास". "चिरंतन विकास"
विकास अणि पर्यावरण याविषयावर काम करणारी संयुक्त राष्ट्रसंघाची एक संस्था आहे युनायटेड नेशन्स वर्ल्ड कमिशन ऑन एनव्हायर्नमेंट अॅन्ड डेव्हलपमेंट(United Nations World Commission on Environment and Development) या नावाची. या संस्थेने १९८७ मध्ये "टिकाऊ विकासाची" एक सुंदर व्याख्या केली आहे. ते म्हणतात: "जेंव्हा आजची पिढी त्यांच्या आजच्या गरजा भागवताना उद्याच्या पिढीच्या विकास करण्याच्या क्षमतेत बाधा आणत नाही तेंव्हा तो टिकाऊ विकास म्हणायचा ".
"विकास" म्हणजे "टिकाऊ विकास", "चिरंतन विकास" आणि तो करताना काहीही ओरबाडणार नाही, उद्याच्या पिढ्यांना त्रास होणार नाही तो विकास असं आम्हीही मानतो. त्यासाठी आम्ही १० प्रश्न समोर ठेवले आहेत. ज्यांची उत्तरे दिल्यावर विकास झाला की नाही हे ठरेल. ते प्रश्न असे:
- लोक सुरक्षित आहेत ना?
- महाराष्ट्रातल्या माणसा-माणसांमध्ये आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक गोष्टींमध्ये भीषण अशी तफावत तर नाही ना?
- लोकांना पुरेसं खायला आणि पुरेसं प्यायला शुद्ध पाणी मिळतंय ना?
- लोकांना परवडणारी घरं - त्यात शांतता, खाजगी जागा, नळानं पाणी, शौचालय अशा सुविधा - मिळताहेत ना?
- त्यांना पुरेशा, समाधानकारक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत ना?
- ते त्यांच्या मुलांना त्यांना परवडेल अशा पद्धतीनं दर्जेदार आणि नव्या युगाच्या दृष्टीनं योग्य असं शिक्षण देऊ शकताहेत ना?
- त्यांना त्यांच्या जवळ आणि त्यांना परवडेल अशी आरोग्य सेवा मिळतीय ना?
- त्यांना शुद्ध हवा, त्यांच्या हक्काची नैसर्गिक साधनसंपत्ती, सोयी-सुविधा आणि मनोरंजनाची साधनं मिळताहेत का?
- लोकांमध्ये अस्मिता जागृत आहे का?
- ते भविष्याकडे आशेनी, अपेक्षेनी, महत्वाकांक्षेनी पहाताहेत ना?
अगदी थोडक्यात -
विकास म्हणजे लोकांचा विकास.
विकास म्हणजे लोकांची सुरक्षितता, लोकांचा आनंद.
विकास म्हणजे सर्वांना पुढे जाण्याची संधी.
महाराष्ट्राकडे जे आहे ते वाचवणं, टिकवणं, जोपासणं आणि वाढवणं म्हणजे 'विकास'. मग त्यात निसर्ग आला, संपत्ती आली, नद्या आल्या, माणसं आली, माणसांची क्षमता आली, मराठी संस्कृती आली.
महाराष्ट्राचा विकास म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचा विकास
महाराष्ट्राचा विकास आराखडा बनवताना आपण हे पक्क लक्षात ठेवलं आहे.
जगातील बदलते वारे
जगात सध्या काही महत्वाचे बदल घडत आहेत आणि जग आता इतकं एकमेकाला जोडलं गेलंय की जगात जे घडतंय त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणारच आहे.
जगाची लोकसंख्या
इसवी सन २००० मध्ये जगाची लोकसंख्या होती ६१० कोटी आणि फक्त ५० वर्षांत ती होणार आहे ८९० कोटी. म्हणजे फक्त ५० वर्षांत ती ४७%नी वाढणार आहे! त्याच काळात २००० साली भारताची लोकसंख्या होती १०१ कोटी, जी २०५० ला होणार आहे १५३ कोटी, म्हणजे ती साधारण ५०%नी वाढणार आहे. त्याच वर्षी भारत जगातील सर्वांत जास्त लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जाईल. अजून ५० वर्षांनी हळूहळू जगाची लोकसंख्या स्थिर होत जाईल पण जगापुढे इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या लोकांना पुरेसं खायला देणं आणि प्यायला पाणी देणं या दोन गोष्टी महत्वाची ठरतील. येत्या ५०-१०० वर्षांचं महाराष्ट्राचं अत्यंत चांगलं असं नियोजन आपल्याला करायचं असेल तर आपल्याला या गोष्टींचा बारकाईनं विचार करायला हवा. महाराष्ट्राची लोकसंख्या किती असेल, कशी असेल, त्यात परप्रांतातून होणारे स्थलांतर किती असेल; तसेच त्या लोकसंख्येला पुरेल असं पाणी, अन्नधान्य आणि इतर साधन संपत्ती आपल्याकडे असणार आहे ना याचं भान आपण ठेवायला हवं. फक्त जगण्यासाठीच नव्हे, तर चांगलं जगण्यासाठी! त्याचा नेमका हिशेब आपल्याकडे हवा.
हवामानातील बदल
जगापुढचे आणखी एक आव्हान आहे आणि ते म्हणजे हवामानातील, वातावरणातील बदल. पृथ्वी गरम होते आहे. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण धृवावरील बर्फ वितळत चाललं आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते आहे. जगभर दुष्काळ किंवा काही ठिकाणी पूर येताहेत. ऋतुचक्र निश्चितपणे बदलत आहे ज्याचा परिणाम पर्यावरणावर, जंगलांवर, हवेवर, झाडाझुडपांवर, माणसाच्या तब्येतीवर होताना दिसतो आहे. या सर्वाचा परिणाम महाराष्ट्रावर काय होईल, कुठल्या नैसर्गिक संकटांचा विचार करून ठेवून महाराष्ट्रानं त्यासाठी तयार रहायला हवं? या गोष्टी येत्या काही दशकात फार महत्वाच्या आहेत. महाराष्ट्राचं पुढचं नियोजन करताना या गोष्टींचा विचार आपल्याला करायला हवा. मुख्यत: या संदर्भात महाराष्ट्रात वारंवार पडणारा दुष्काळ आणि त्याचा महाराष्ट्राच्या जनजीवनावर होणारा परिणाम याचा नेमका अंदाज आपल्याला घ्यायला हवा.
तंत्रज्ञानाची झेप
जगभरच्या विविध शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचा जो अभ्यास चालू आहे त्यामुळे फार वेगानं समाज बदलणार आहे. नॅनोटेक्नोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय शास्त्र यांतील शोधांमुळे पुढचा समाज नेमका कसा असेल याचा अंदाज बांधता येणं कठीण आहे. वय उलटं फिरवता येईल, माणूस जास्त वर्षं जगेल, कृत्रिम अवयवांचा जमाना येईल, त्यामुळे अवयव बदलता येतील. कमीत कमी संसाधनांमध्ये जास्त उत्पन्न काढता येईल. त्यानं अर्थकारण बदलेल. ऊर्जेची नवी साधनं सापडतील, स्वत:ला लागणारी ऊर्जा स्वत: निर्माण करणारी उपकरणं, घरं, तयार होतील, त्यामुळे एका ठिकाणी वीज निर्माण करायची आणि ती दुसरीकडे पाठवायची ही गोष्ट थांबेल. या आणि अशा गोष्टींनी समाज येत्या १००-५० वर्षांत खूपच बदलणार आहे. आपण त्याचा अंदाज बांधला आहे का? हे पहायला हवं, तसा प्रयत्न करायला हवा.
माणसाचं शहाणपण ही सर्वात अनमोल गोष्ट
जगातील समाज हा ज्ञानी समाज (Knowledge Society) होऊ लागला आहे. अर्थकारणाच्या स्पर्धेत ज्याच्याकडे ज्ञान, कसब, कौशल्य, माहिती अधिक तो अधिक मौल्यवान असं होत जाणार आहे. ज्या समाजात ज्ञान, शहाणपण जास्त तो समाज पुढारलेला असं असणार आहे. फार पूर्वी जमिनीला जे महत्व होतं, नंतर व्यापाराला आणि त्यानंतर जे महत्व भांडवलाला आलं तसं महत्व ज्ञानाला येईल. पीटर ड्रकरनं आपल्या सुप्रसिद्ध "Next Society" या लेखात याविषयी फार मार्मिक विवेचन केलं आहे . या बाबतीत महाराष्ट्राची परंपरा मोठी तर आहेच पण आपण यापुढेही खूप प्रगती करू शकतो आणि जगात मानाचं स्थान पटकावू शकतो अशी आजची स्थिती आहे. तसा "ज्ञानी", "शहाणा" समाज आपण बनावं अशी आकांक्षा आपण ठेवायला हवी.
जगाची दिशा शहरीकरणाकडे
जग शहरी होताना दिसतं आहे. अजून १०० वर्षानी शहरी, ग्रामीण, आदिवासी असा फरक निदान जगात तरी राहणार नाही. जग शहरी होणार. जगाची दिशा तीच आहे. मग असं असेल तर महाराष्ट्र तर यात अगोदरच अग्रेसर आहे. या परिस्थितीचा आपल्याला फायदा घेता येईल का हे ही पहायला हवं. महाराष्ट्रात या प्रक्रियेला सकारात्मक, रचनात्मक वळण देता येईल का हे बघणं आवश्यक आहे.
याखेरीज सर्वच क्षेत्रांत महिलांचा वाढता सहभाग, नव्या अर्थरचनेत "शासन" या संस्थेचं बदलतं स्वरूप, कुटुंब, शाळा यांसारख्या सामाजिक संस्थांची बदलणारी गरज, जगातला संस्कृती संघर्ष, ठिकठिकाणी उफाळणारा दहशतवाद, उपराष्ट्रवादांची चळवळ यासारख्या गोष्टींचाही परिणाम महाराष्ट्रावर, महाराष्ट्रातील लोकांवर होईल ज्याचा आपल्याला आवर्जून विचार करावा लागेल.
प्रत्येक व्यक्तीचं मत महत्वाचं
बदलत्या परिस्थितीत प्रत्येक माणसाला स्वत:चं मत आहे, असतं, आणि ते मत त्यांना व्यक्त करायचं असतं. इथून पुढे प्रत्येक व्यक्तीचं मत महत्वाचं ठरणार आहे, त्याची नोंद घ्यावी लागणार आहे. ही गोष्ट खरं म्हणजे लोकशाही बळकट करू शकेल. सर्वांचं मिळून जे शहाणपण असतं ते आपल्याला खूप पुढे नेईल. तंत्रज्ञानामुळे प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याची संधी सहज देता येऊ शकेल. आपण हे केलं, त्याला नीट वळण दिलं तर आपल्या समाजाची ती एक मोठी बाजू ठरेल.
ज्या गोष्टी भविष्यात होऊ घातल्या आहेत, त्यातल्या काहींचा इथे उल्लेख केला आहे. हा आराखडा लिहीताना होऊ घातलेल्या या व अशा अनेक बदलांचा आम्ही विचार केला आहे.
होय. हे शक्य आहे
शेवटी थोडक्यात –
- आनंदी समाज, आनंदी महाराष्ट्र, सुंदर महाराष्ट्र. मूलभूत गरजा भागलेला, नव्या आकांक्षा मनात ठेवून पुढे जाणारा महाराष्ट्र.
- ज्ञानी समाज, ज्ञानी महाराष्ट्र. दर्जेदार शिक्षण, व्यवसाय शिक्षण आणि तंत्रज्ञानानं युक्त असा नव्या युगातला महाराष्ट्र.
- खुली अर्थव्यवस्था, मुक्त वातावरण. उद्योगाचं मुक्त वातावरण, शेती खुल्या अर्थव्यवस्थेला जोडलेली असा उद्योजक महाराष्ट्र.
- स्वावलंबन – शासनाचे, लोकांचे. नवा आर्थिक विचार, नवी करप्रणाली, बळकट स्थानिक स्वराज्य संस्था.
- गुणांवर, मुक्त स्पर्धेला उत्तेजन देणारी व्यवस्था. सर्वत्र दर्जा महत्वाचा, कामात, शिक्षणात, उद्योगात, प्रशासनात, गुणांना वाव देणारी व्यवस्था.
- विकेंद्रित रचना – विकासाची, राज्यकारभाराची, प्रशासनाची. स्थानिकांच्या हाती अधिक कारभार आणि जबाबदारी, विकासाचा असमतोल कमी केलेला.
- जागतिक नकाशावरचा बलवान महाराष्ट्र प्रागतिक दृष्टी ठेवून, जागतिक स्पर्धेत अव्वल ठरलेला, मराठी महाराष्ट्र.
या घडीला आज आपण हा नवा, उद्याचा, प्रगतीशील महाराष्ट्र उभा करण्याची आकांक्षा मनात ठेवायला हवी. त्यासाठी योगदान देण्याची तयारी हवी.
मला तुमची साथ हवी..
माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, महाराष्ट्र तुम्हाला साद घालतो आहे, त्या हाकेला ओ देण्यासाठी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्यासाठी तयार रहा, तसंच त्यासाठी कष्ट करण्याची आणि तुमचं योगदान देण्याचीही तयारी ठेवा. लक्षात ठेवा काहीही फुकट मिळत नाही. कष्ट करून मिळवावं लागतं आणि आपल्याला माहीत आहे जे फुकट मिळतं ते टिकत नाही आणि आपल्याला तर टिकाऊ, अनेक वर्ष चालणारा विकास या महाराष्ट्रात करायचा आहे. तुम्हा सर्वांच्या सहकर्याची मी मनोमन अपेक्षा बाळगतो.
सस्नेह जय महाराष्ट्र!
आपला नम्र
राज ठाकरे
No comments:
Post a Comment