Friday, August 26, 2016

बाल संगोपन

उद्याचा महाराष्ट्रीय नागरिक घडवण्यासाठी उत्तम बालसंगोपन

एका समाजशास्त्रज्ञाने म्हणून ठेवलं आहे, "कुठल्याही समाज आपल्या लहान मुलांना कसं वाढवतो हे सांगा, मी तुम्हाला त्या समाजाच्या भविष्यात काय लिहून ठेवलंय ते सांगतो!"
आपलं, आपल्या समाजाचं, महाराष्ट्राचं भविष्य अबाधित राखण्यासाठी इथल्या भूमीत जन्मणार्‍या प्रत्येक मुला-मुलीचे बालपण उत्तम जावे; प्रौढपणात प्रवेश करताना प्रत्येक मुला-मुलीने आनंदी असावे, उत्तम आरोग्य त्यांना मिळावे यासाठी बाळाच्या जन्मापासूनच आपण विचार करायला हवा. तो असा.

प्रश्नाचं स्वरूप


असे दिसते की बऱ्याच वेळेस नवनिवाहित जोडप्यांना बाळाला सांभाळायचे कसे, मुलांना वाढवायचे कसे याबद्दल फार माहिती नसते. एकत्र कुटूंबपद्धती संपुष्टात आल्यामुळे त्यांना सांगायलाही कुणी नसते. बाळ होण्यापर्यंतच्या कालावधीत दवाखान्याचा आधार असतो पण बाळ झाल्यावर त्या जोडप्याच्या आयुष्यात एका नवीन व्यक्तीचा प्रवेश होतो आणि त्यांची सर्व दिनचर्याच बदलून जाते. या बदलाला बरेच जण मानसिक रित्या तयार नसतात. बाळ घरी येते, आणि पालकांना, विशेषकरून आईला पूर्ण गुंतवून टाकते. तिचे दिवसाचे वेळापत्रक बाळाच्या गरजांनुसार तिला बदलावे लागते. मजूरी करणार्याव बाईला कदाचित त्या बाळासाठी घरी राहणे परवडत नाही आणि तिला बाळाला घेऊन लगेचच कामावर जावे लागते. ज्या बाईला सुटी मिळते तिला या बदलाला जमवून घेण्यासाठी काही दिवस मिळतात. पण तरीही घरकाम, घरातल्या इतर जबाबदार्‍या सांभाळताना तिची कसरतच होते.
बाळाच्या वाढीचे सर्वच टप्पे महत्वाचे असतात. त्याच्या वयानुरूप पुरेसा आणि सकस आहार मिळणे, शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी सुरक्षित वातावरण व कुटूंबियांचा सहवास मिळणे, बौद्धिक आणि शारिरीक वाढीसाठी व्यायाम पुरेसा होणे, मेंदूच्या विकासासाठी योग्य चालना देणे; अशा सर्व बाबी नीट झाल्या तर बाळाची वाढ उत्तम होऊ शकते आणि प्रौढ वयातही ते निरोगी आणि आनंदी राहू शकते.
या सर्वाविषयीची फारशी माहिती नसल्यामुळे आपण आल्या प्रसंगाला सामोरे जातो तसंच पालकत्वालाही सामोरे जातो. आणि त्याचे परिणाम बाळावर आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील नागरिकावर होतात.

असं का होतं?


आज शाळेत हा विषय शिकवला जात नाही. एकत्र कुटूंब पद्धत जाऊन चौकोनी कुटूंब आल्यामुळे पहिल्या-वहिल्या पालकांना हे सांगायला कुणी असतंच असं नाही. बरं, जरी असं कुणी असलं, तरी त्यांची माहिती शास्त्राला धरून असतेच असं नाही. हे सर्व विषय नुसते पुस्तकातून शिकूनही होत नाहीत, त्याला अनुभवाची जोड लागते.
बदलत्या जगातले हे सामाजिक संस्थांमधले स्थित्यंतर ओळखून त्यातल्या त्रुटी काढण्यासाठी आपण आज काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत, म्हणून हे सर्व प्रश्न उद्भवतात.

काय करायला हवं?


मुलांच्या बालवयात (किमान पहिली ६ वर्षे) त्यांचा जास्तीत जास्त वेळ घरी, आपल्या आई-वडिलांसोबत, कुटूंबियांसोबत जायला हवा. हे मुलाच्या मानसिकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे – यामुळे मुलांच्या मनात सुरक्षिततेची भावना दृढ होते आणि त्यांचा आत्मविश्वास बळावतो. मूल होऊ देताना या सर्वाचा विचार व्हायला हवा. आणि त्याची तयारी म्हणून वेगवेगळ्या पातळीवर माहिती दिली जायला हवी, अभ्यासक्रमाचा भाग म्हणून हे विषय शिकवले जायला हवेत.
  • प्राथमिक शिक्षणात आहार, बाल-संगोपन व संलग्न विषयांचा समावेश
  • प्रसूतीगृहांमध्ये गरोदरपणाच्या काळात आणि नंतरही गरजेनुसार पालकांचे समुपदेशन
  • प्रत्येक बाळाची पहिली किमान ४ वर्ष पालकांसोबत असावीत म्हणून विशेष प्रयत्न
  • शास्त्राचा आधार घेऊन चालवलेल्या बालवाड्या

महत्वाच्या कल्पना


  • पालकांचे बालसंगोपनाविषयीचे समुपदेशन
  • कामाच्या ठिकाणी पाळणाघरे

कार्यक्रम


नवविवाहित जोडप्यांना याबाबतीत मदत, समुपदेशन तसेच योग्य माहिती-वजा-प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक प्रसूतीगृहाअंतर्गत व्यवस्था केली जावी असा आमचा आग्रह असेल.
जिथे आई-वडिल दोघेही काम करतात तिथे कामाच्या ठिकाणी आपल्या मुलांना घेऊन जाता येईल अशी सोय करण्यासाठी संबंधितांना (employers) प्रोत्साहन दिले जावे. जिथे हे शक्य नाही तिथे पाळणाघरे उभारण्याचा प्रयत्न असावा. मात्र चार वर्षाखालील लहान मुलांना सांभाळणे हे कौशल्याचे तसेच जोखमीचे काम आहे. आज कुणीही उठून पाळणाघर, अंगणवाडी, प्ले-ग्रुप वा नर्सरी चालवते. हे योग्य नाही. पाळणाघरांमधून योग्य व्यवस्था व प्रशिक्षित व्यक्ती असेल याची खात्री करायला हवी.
चार वर्षाखालील मुलांना कुठल्याही शाळेत वा बालवाडीत प्रवेश घेण्याचा आग्रह आपण टाळायला हवा. मात्र ४ वर्ष पूर्ण झालेल्या बालकांना पूर्वप्राथमिक स्तरातील वर्गात प्रवेश घेण्याची मुभा असावी. या वयात मुलांचे शरीर तयार होत असते, मेंदू वाढत असतो. त्यास कुठेही खीळ बसू न देता हे कार्य उत्तमरित्या होण्यासाठीचे पोषक वातावरण बालवाडीत मिळायला हवे. खेळणे, गाणी-गोष्टी ऐकणे यातून निरिक्षण शक्ती विकसित करणे, fine motor skills वाढवणे, इ. वरच भर दिला जावा. कुठल्याही प्रकारे मुलांवर ताण पडणार नाही आणि अत्यंत आनंदी, खेळी-मेळीच्या वातावरणातच मुले राहतील असा प्रयत्न असावा. अक्षर-अंक ओळख करून देण्याचा आग्रह अजिबात नसावा. बालमानसशास्त्राची उत्तम माहिती असलेली, तसेच योग्य कौशल्ये असलेल्या व्यक्तीच बालवाड्या चालवू शकतील असा आग्रह आपण धरावा. यावरही शासनाचे नियंत्रण असावे.

No comments:

Post a Comment

Pages

My Blog List